ती सध्या काय करते?

पाऊस धो धो कोसळतोय. सकाळपासून जणू काही आकाशाने आपली पोतडी ओलेत्या जमिनीवर रिती करावी तशी झड लागली आहे.. ओल्या रस्त्यांवर फुटणारे टपोरे थेंब येणारी जाणारी वाहने निर्दयीपणे आपल्या पायांखाली तुडवत आहेत, पण त्या बिचारया थेंबांना त्याचे काही नाही! विजांच्या नर्तनात ते लागोपाठ निसरडया रस्त्याला आहुती जात आहेत!

मी आपला केव्हापासुन बस स्टॉपच्या शेडच्या आडोश्याने ही पावसाळी गम्मत पाहतोय! बस अशीच लेट करत राहो असे वाटत राहते. खरं तर मला पाऊस खुप आवडतो. वर्षभर तो असाच धो धो का पडत राहत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र ढग देत नाहीत.. भस्कन् अंगावर आल्यासारखा अक्राळ विक्राळ आवाज काढत जाणारा डम्पर शेडच्या पागोळीची धार थोडीशी माझ्या अंगावर रीती करुन मात्र जातो!

एक छत्री लगबगीने डबक्यांना चुकवत शेडच्या आडोश्याला येते. क्षणभर मला हा शेड वाळवंटातल्या एओसिस सारखा वाटायला लागतो! पण क्षणभरच, छत्रीला चुकवून आलेल्या काही चुकार थेंबांना हुसकावून लावणाऱ्या केसांची बट माझे लक्ष वेधुन घेते.. क्षणभर!
आपल्या ओलेत्या केसांना सरळ करण्यासाठी ती मान वळवते.. एक विज लखकन् माझ्या मेंदुतुन आरपार जाते..

ती.. ती माझ्यासमोर.. मधली कित्येक वर्षे पाण्याच्या थेंबासारखी वाहून गेली.. पावसामधल्या चहासारखे ते उबदार दिवस.. भेटीची वेडी हुरहुर.. झड़ लागल्यासारख्या कधी संपूच नये अश्या वाटणाऱ्या पहाटगप्पा.. पण सगळ संपलं.. तीला पुढे जायचं होतं.. ती गेली..!
क्षणभर वाटले तीला सगळे काही विचारावे.. पण पाय कुठेतरी खोल थिजले होते.. ती जात होती तेव्हाही त्यांनीच दगा दिला होता.

कडाडून विज चमकली.. मी भानावार आलो. तिची बस आली होती.. माझे सगळे प्रश्न रस्त्यावर बेफाम फुटणाऱ्या थेंबांसारखे आतच फुटून गेले.. जाताना तिने हलकेच मागे वळून पाहिले.. तिच्या नजरेत कुठेतरी आभाळ भरुन आले होते... पण थेंब मात्र झरले नाहीत..
ती गेली, आजही काही न सांगता, अचानक चमकलेल्या विजेसारखी क्षणभर सगळे क्षण भारित करून..
ती पहिल्यांदा भेटली तेव्हा बेफाम पाऊस होता आणि ती गेली तेव्हाही तोच! पावसाला बहुदा माझी सगळी गुजं माहीत आहेत, त्यामुळेच तो माझ्याशी इतका बोलतो..

पावसालाच आज मी पुन्हा विचारतो..
ती सध्या काय करते?

Comments

Popular posts from this blog

जो वादा किया वो निभाना पड़ेगा

Swades: Vibrant canvas of characters on journey of self discovery!

First Contact