शेक्सपिअर आणि तुकोबा
आज जागतिक पुस्तक दिवस. सकाळी सहज म्हणून माझ्या छोटयाश्या पुस्तकांच्या रॅक लक्ष गेले तर दिसले की हे दोघे अगदी शेजारी मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि जणूकाही कवर्स च्या आडून व्यवस्थित गप्पा मारत आहेत! मग सहज विचार केला की जर हे दोघे खरच जर भेटले असते तर काय हितगुज झाले असते? माझ्या एवढ्याश्या डोक्यात बसणारा हा विचार नक्कीच नाही..
एक देहूचा वाणी, दुसरा मध्ययुगीन इंग्लंड मधला एस्टेट ब्रोकर, पाहिलं तर करोडो मर्त्य दीव्यांसारखे काळाच्या ओघात हे दोघेही विझून गेले असते पण पण.. लेखणी मध्ये आली आणि अणू रेनुसारखा थोबडा असणारा तुकया आकाशाएवढा झाला; वर्विक्शायर नामक कुठल्याश्या काऊनटीत जन्मलेला विल्यम जगभरातल्या तमाम लेखक-कवीजणांसाठी मायबाप झाला!
दोघांचाही काळ पाच पन्नासएक वर्षे पुढे मागे म्हणजे जवळपास सारखाच..
शेक्सपिअरला मानवी मानवी मनात चाललेल्या गुंत्यांची आणि खळबलीची भयंकर ओढ! त्याने जुन्या ग्रीक शोकांतिकांच्या नरड्यावरच घाव घातला.. तोपर्यंत परिस्थिती माणसाला विवश करते आणि मग जे काही उनेदुने घडते ते त्याचा परिपाक असा समज होता; तो शेक्सपिअरने मुळापासून खणुन काढला.. मानवी मनाला त्याने सगळ्या उलापथिन्च्या केंद्रस्थानी आणले. मग त्याच्या बरोबर येनारी प्रत्येक भावना त्याच्या प्रतिभेच्या समुद्रात गटांगळ्या खाऊ लागली. अपमान, सूड, असुया, प्रेम, भीती, निराशा, वासना काही म्हणजे काही त्याच्या दैवी लेखनीने सोडले नाही.. आणि त्या उण्यपुर्या पन्नास वर्षांत ह्या आवलियाने पुर्या जगाला गारुड घालणारी, कितीही विश्लेषण करूनही दर वेळी पुरून उरणारी, जगभरातल्या कलेच्या दिवान्यांसाठी ४०० वर्षे न संपणारी नशा लिहून काढली.. आजही हैदर हॅमलेट च्या साच्यात चपखल बसतो यातच सगळे आले. त्याना काळाचे बंधन कधीच असणार नाही कारण 'माइंड इस सीन ऑफ ऑल क्राइम्स'!
तुकोबानी ज्या आतुरतेने पांडुरंगाला साद घातली तितक्याच सहजतेने समाजातल्या दम्भिकतेवर प्रहार केले.. खरे म्हणजे त्या वेळेच्या मध्ययुगीन दुष्काळ, यवनि स्वार्यांत पिचलेल्या महाराष्ट्रात एक साधा भोळा वाणी अभंग रचतो काय, कीर्तने करून पारंपरिक व्यवस्थेला आव्हान देतो काय हे सगळे चमत्करापेक्षा कमी नव्हते! त्यांच्या अभंगानाही काळाची चौकट नाही.. अध्यात्मच्याही वरती जाउन ते गेले जवळपास ४०० वर्षे दीपस्तंभासारखे अंधार्या रात्री दिशा दाखवत आले आहेत!
गंमत म्हणजे जिवंतपणी ना तुकोबा आक्सेप्ट केले गेले ना शेक्सपिअर! तुकोबांच्या वाटेत दांभिक होते; शेक्सपिअर ह्या बाबतीत तसा बराच सुदैवि होता पण त्याचे साहित्यही एवढ्या सहज लोकांनी डोक्यावर घेतले नाही.. असे म्हणतात की शेक्सपिअरच्या . घराला जेव्हा नंतर पाडा.यची वेळ आली तेव्हा चार जाणत्या लोकानी ते खरेदी करून तिथे त्याचे संग्रहालय बनवले!
शेक्सपिअरचा आज ४०० वा स्मृतीदिन! जसा शेक्सपिअर जगभर इंटर्प्रिट केला गेलाय तसेच तुकोबा ही केले जावे अशी माझी मनोमन इच्छा आहे कारण त्यांचे साहित्यही तितक्याच मोलाचे आहे!
जर शेक्सपिअर आणि तुकोबा समोरासमोर भेटले तर बाकी काही नाही सांगता येणार पण त्यानी एकमेकांना तुकया आणि विल्या म्हणूनच हाक मारली असती.. एवढे मात्र नक्की!
तसे पण नावात काय आहे असे कोणीतरी म्हटलेच आहे ना!!
Comments
Post a Comment