जो वादा किया वो निभाना पड़ेगा

जो वादा किया वो निभाना पड़ेगा
---------------------------------------------------
सकाळची वेळ असते. ऑफिस, मीटिंग्स, मेल्स.. डोक्यामध्ये कामाचा ऑलरेडी पिंगा चालू झालेला असतो. सिग्नलवर 'काय हे ट्रॅफिक' चा कटकट राग अलापून एक दोनदा घड्याळामध्ये वेळही पाहून होते.
आणि अचानक कुठल्यातरी ट्रकच्या रेडिओवर विविध भारतीची ती ओळखीची ओळ ऐकू येते.. 'आईए अब सुनते है फिल्म ताज महाल का इक गाना जो लिखा है साहिर लुधियानवी ने, धून बनाई है संगीतकार रोशन ने और इसे गाया है लता मंगेशकर और मोहम्मद रफी ने'.. माझे कान जागे होतात.. मोहम्मद रफी म्हणजे दैवत.. आणि त्यांची गाणी म्हणजे भक्ती..
बासरी आणि सारंगी ची मंत्रमुग्ध सुरावट संपते आणि रफी साहेबांचा आर्जव करणारा स्वर 'जो वादा किया वो निभाना पडेगा.. रोके जमाना चाहे रोके खुदाई तुम को आना पडेगा..' गाऊ लागतो..
एका मिनिटापूर्वी कैदे सारखे वाटणारे ट्रॅफिक आता पुढची 3-4 मिनिटे ढिम्म हलले नाही तरी चालेल असा विचार शिवून जातो.. सिग्नल सुटतो पण माझा मूड मात्र सेट होतो.. दिवसभर 'जो वादा' डोक्यामध्ये वाजत राहते.. संध्याकाळी मग मात्र लूप वर लावून ऐकतो..
काही गाण्यांमध्ये एक जादू असते, ती तुम्हाला ऐकताक्षणीच ओढून घेतात.. 'जो वादा किया' हे त्याच जातकुळीमधले!
रफी साहेबांचा गळा म्हणजे अली बाबाची गुहा! 'जो जे
वांछिल तो ते लाहो' प्रमाणे त्यात सगळ्यांसाठी सगळे होते/आहे.. ऐकणाऱ्यांसाठी, संगीतकारासाठी, गीतकारांसाठी, सहगायकांसाठी! फक्त तुमच्याकडे रफी समजण्याची कुवत पाहिजे!
नौशादला रफीचा गळा सगळ्यांच्या आधी सापडला आणि म्हणून त्याने तो भरभरून लुटला! 50 च्या दशकात जेव्हा सचिन देव बर्मन, शंकर जयकिशन, O P नय्यर रफी साहेबांच्या दैवी गळ्यामधून एक से एक हिरे काढत होते तेव्हा संगीतकार रोशन स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होता.. जिकडे राज कपूर साठी मुकेश आणि शंकर जयकिशन, सचिनदा-देव आनंद अशी समीकरणे होती तिथे रोशनसाठी मिळेल त्यावर समाधानी होणे भाग होते.
पण रोशनला रफी साहेबांच्या जादुई आवाजावर आपली मोहर लावण्याची संधी 1960 मध्ये मिळाली आणि काय खूब मिळाली!
बरसात की रात मध्ये रफीनी रोशनसाठी दोन सुंदर गाणी गायली 'जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात' आणि 'नां तो कारवा की तलाश है' ही कव्वाली! त्यांच्याविषयी नंतर..
1963 मध्ये ताज महाल आला. मुघल सम्राट शहाजहान आणि मुमताज यांच्या वर.. रोशन, रफी आणि साहिर ही तिकडी पुन्हा एकत्र आली आणि संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय खजिना रिता करून गेली!
'जो वादा' राग पहाडी वर आधारित आहे. पहाडी राग थोडा विराहाचा राग आहे.. त्याच्यामध्ये कुठेतरी आर्जव आहे. म्हणून बहुतेक भजन वगैरे मध्ये तो चपखल बसतो..
'जो वादा' ची तीन व्हर्जन आहेत.. एक तरुण शहाजहान-मुमताज, दुसरे कैदेमधला शहाजहान आणि तिसरे मृत्यूशय्येवरचा शहाजहान..विरह.. म्हणून राग पहाडी. तिन्ही रफी-लता युगल आहेत.
रफी साहेबांची एक खासियत होती, पडद्यावर देव आनंद असू की जॉनी वॉकर; रफी प्रत्येकासाठी ती व्यक्ती होऊन गायचे म्हणूनच 'जिंदगी भर नही भुलेगी' गाणारा भारत भूषण आणि 'जो वादा' गाणारा शहाजहान प्रदीप कुमारच गातोय असे वाटते. दुसरे म्हणजे रफी गाण्याच्या मूड आणि सिचुएशन मध्ये ताबडतोब चपखल जायचे.. एखादे विरही गाणे गाताना जसे काय ते खुद्द बेजार आहेत की काय असे वाटते. ह्या गाण्याच्या तिन्ही वेगवेगळ्या व्हर्जन मध्ये ते पुन्हा जाणवत राहते. 'जाने हया जाने अदा छोडो तरसाना तुमको आना पड़ेगा' गाताना त्यांनी असे नाजूक आर्जव केले आहे की कुठल्याही मुमताजचे हृदय ते ऐकून पाघळले असते!
लता दिदींबद्दल आपण काय बोलणार; मर्त्य लोकांना गंधर्वांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही!
इथे 'जो वादा' मध्ये त्या शालीन मुमताज आहेत. ' हम अपनी वफा पे ना इलजाम लेंगे, तुम्हे दिल दिया है तुम्हे जाँ भी देंगे' शहाजहानला वचन देणारे घरंदाज स्वर त्यांनी तंतोतंत सांभाळले आहेत.. पण हे गाणे रफी साहेबांचे आहे; साहिरचेही आहे.. शहाजहान-मुमताज मध्ये कुठेतरी साहिर-अमृता डोकावत राहतात!
शेवट येता येता 'हमारी कहानी तुम्हारा फसाना हमेशा हमेशा कहेगा जमाना' म्हणत कालपलटावर अदृश्य होणारे शाहजहान-मुमताज आणि टिपेला पोहोचलेला रफी-लतांचा स्वर कुठेतरी आपल्याला मंत्रमुग्ध करून जातो..
शहाजहानने प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहाल बांधला
आणि रोशन-साहिर-रफी-लता यांनी संगीतविश्वाचा ज्याला आपण अमर 'ताजमहाल' म्हणू शकू असे हे सुंदर गाणे दिले!
धन्य ते लोक..
'जो वादा' ची जादूनगरी रंगावण्याचा हा माझा छोटा प्रयत्न!
जाता जाता-
'जो वादा' चे अरिजित सिंगचे आताचे व्हर्जन किंवा त्याने केलेली त्या सुंदर गाण्याची कत्तल ऐकली की हिंदी सिनेसंगीत किती दिवाळखोरी मध्ये आले आहे समजते.. कोणी चुकून ते ऐकू नये म्हणून ओरिजिनल गाण्याच्या तिन्ही व्हर्जनची खाली Youtube लिंक.

https://youtu.be/XenKjkMFmuM

Comments

Popular posts from this blog

Swades: Vibrant canvas of characters on journey of self discovery!

First Contact