वारी - एक आनंद निधान

 जेव्हा एखादी परंपरा काही वर्षे समाजात रुजते तेव्हा तिला धुमारे फुटू लागतात, आणखी काही वर्षे ती जगलिच तर त्या धुमार्‍यान्चा एक वृक्ष होतो, ज्याच्या अंगाखांद्यावर समाज बहरतो. पण जर हीच परंपरा अविरत शेकडो वर्षे चालत राहिली तर तिचा भव्य-दिव्य असा दिशादर्शक. वटवृक्ष बनतो!
वारीचा हा आधारवड तब्बल आठशेहून अधिक वर्षे जुना आहे!

असे म्हणतात की संत ज्ञानेश्वरांचे पणजोबा श्री त्र्यंबकपंत कुलकर्णी हे आपेगाव ते पंढरपूर वारी करत. बाराव्या शतकाचा काळ तो, वारीची परंपरा याहूनही जुनी असावी!  ज्ञानदेव माउलींनी त्यांच्या लाडक्या विठाईचे तेजपुंज रूप याची देही याची डोळा पाहिल्यानंतर किती सुंदररित्या वर्णिले आहे.    

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा I

ज्ञानदेवे रचिला पाया असे म्हणतात. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाला चालना दिली. पुढे नामदेवांनी ही पताका पंजाब पर्यंत फडकावली. नामदेवांनी, अस्मानी सुलतानी संकटे झेलत कधी अनवाणी तर कधी उपाशीपोटी पण न चुकता लाडक्या विठूरायाला भेटायला जाणाऱ्या वारकऱ्याला नक्की काय हवे असते याचे सुंदर वर्णन केले आहे

पंढरीचा वास चंद्रभागे स्‍नान ।
आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥

हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणें श्रीहरी नाहीं दुजें ॥२॥

मुखीं नाम सदा संतांचें दर्शन ।
जनीं जनार्दन ऐसा भाव ॥३॥

नामा ह्मणे तुझें नित्य महाद्वारीं ।
कीर्तन गजरीं सप्रेमाचे ॥४॥    

थकल्या पावलांना चंद्रभागेच्या मऊ वाळूचा स्पर्श झाला की वारकरयाची सगळी दुःखे क्षणात पळून जातात. मग चंद्रभागेत स्नान, विठूमाऊलीच्या चरणांना स्पर्श आणि पंढरपुरात निवास ,हेच भाग्य जन्मोजन्मी मिळूदे, आणिक देवाकडे आणखी काय मागावे, असे ते म्हणतात!

तो काळ मध्ययुगाचा होता आर्थिक, सामाजिक विषमतेने सगळा महाराष्ट्रच ग्रासलेला होता. मनामध्ये कितीही आस असली तरी विठुरायाचे दर्शन दिन-दलितांसाठी स्वप्नच होते. वारी घडायची  पण पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश नाही. संत चोखामेळा यांचे अभंग ती सल किती गहिरी होती याचा वारंवार प्रत्यय देतात

उंबरठ्यासी कैसे शिवू ? आह्मी जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आह्मी दीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग I

किंवा

धांव घाली विठू आता चालू नको मंद ।
बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला ।
शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥

अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा ।
नकाजी मोकलू चक्रपाणि जिमेदारा ॥३॥

जोडुनिया कर चोखा विनवितो देवा ।
बोलिला उतरी परि राग नसावा ॥४॥

एवढे घाव सोसूनही त्यांच्या मनी असलेले विठ्ठलाचे प्रेम कधी कमी झाले नाही. आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या चोखोबांना मात्र मरणानंतर संत नामदेव महाराजांच्या समाधी शेजारी स्थान मिळाले.

गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, सावता माळी; विठोबाचे भक्त सगळे कष्टकरी! आजही वारीमध्ये बहुसंख्य शेतकरी-कष्टकरीच असतात. आपले काम इमाने-इतबारे करावे व मुखी हरिनाम जपावे!  वारीचा काळ म्हणजे शेतातली कामे मार्गी लावून थोडा निर्धास्त होण्याचा काळ. मग डोक्यात विठूमाई पिंगा घालू लागते अन पावले आपोआपच वारीच्या दिशेने वळतात!

तू माझी माउली तू माझी साउली | पाहतो वाटुली पांडुरंगे ||१||
तू मज एकुला वडील धाकुला | तू मज आपुला सोयरा जीव ||२||
तुका म्हणे जीव तुजपाशी असे | तुजवीण ओस सर्व दिशा ||३||

मध्ययुगीन महाराष्ट्रात स्त्रियांची स्थिती काही ठिकशी नव्हती, पण सामाजिक आर्थिक बंधने विठूच्या लेकरांना अडवत तर कशी! संत जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई अशी काही उदाहरणे सापडतात ज्यांनी बंधने आणि पाश तोडून विठू माउली च्या नावाने टाहो फोडला.

तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई

मोकलूनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयांत

अशी आर्त साद घातल्यावर उत्तर न देईल तो देव कसला! त्याने ह्या त्याच्या पिडलेल्या लेकरांना जवळ घेऊन अमरत्वाचे देणे दिले. आयुष्यभर खस्ता खाणारे ते मर्त्य जीव इहलोकाची यात्रा संपल्या नंतर संतपदी पोचून लाखो पीडित जीवांसाठी दीपस्तंभ बनले!

पंधराव्या शतकापर्यंत अभंग भक्त आणि देव ह्यांच्यात अंतर राखून बोलायचे, समाजातल्या कुप्रथांवर, अन्यायावर त्यांनी वार केले नाहीत; कदाचित काळच तास होता.
पण हेही बदलले - आधी संत एकनाथ, मग तुकोबा!

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग I

एकनाथांनी असे सुंदर अभंगही लिहिले व

सत्त्वगुण लावा अंगारा, अन्‌ विंचू इंगळी उतरे झरझरा

असे भारूड लावून समाज प्रबोधनही केले.

पुढे तुकोबांनी भक्ती आणि प्रबोधन यांचा सुवर्णमध्य साधला. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या दिमाखदार मंदिरावर कळस चढवण्याचे काम केले. तुकोबानंतर, त्या ताकदीचे संत न व्हावे हे त्याचेच द्योतक तर नाही.
असे म्हणतात की महाभारताने जगण्याच्या सगळ्या अंगांना स्पर्श केला; तसाच स्पर्श तुकोबांच्या अभंगांनीही आपल्या जगण्यालाही केला आहे.

आनंदाचे डोही आनंदतरंग ।

किंवा
तुका म्हणे धावा आहे पंढरी आहे विसावा

हा ईश्वरभेटीसाठी आतुर झालेल्या मनाचा आनंद हुंकार

आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥

देवभेटीनंतर तृप्त झालेले मन

अगा करुणाकरा करितसें धांवा ।
या मज सोडवा लवकरी

ईश्वरभेटीसाठी व्याकुळ झालेले मन
   
आधी बीज एकले

विश्वाच्या सृजनतेचे काव्य

किंवा  भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी

म्हणत दांभिकतेवर केलेला प्रहार असो, तुकोबा आकाशाला गवसणी घालतात!

आठशे वर्षे झाली, ह्या वटवृक्षाच्या पारंब्या ज्ञाना, तुकोबा, नामदेव बनून समाजमनाच्या तळापर्यंत जाऊन खोल रुतल्या आहेत, आजही फोफावत आहेत.
फक्त वारकरी, संतच नाहीत तर लेखक, कवी, कलाकार ह्यांच्या सृजनाचा सोहळा पांडुरंग आणि पंढरी यांच्याशी एकरूप झाला की अजरामर बनतो. मग कोणी लता 'मोगरा फुलला' जणूकाही ज्ञानदेवच श्रवण करायला बसले आहेत ह्या तन्मयतेने गाते किंवा अजय-अतुलच्या 'माउली' मधून आजही वारी याची देहा याची डोळा घडल्याची अनुभूती मिळते

आजही पंढरी आणि पांडुरंग तसेच आहेत, फक्त अब्जावधी स्पर्शांनी त्याचे पाय झिजले आहेत.
ज्या वाळवंटात संतांनी 'खेळ मांडला' व जिथे वैष्णवांची 'भेटा भेटी ' होते तो चंद्रभागा तीर तोच आहे!          
आजही तुकोबांच्या आणि माउलींच्या पालख्या देव दर्शनासाठी निघाल्या आहेत आणि बरोबर आहेच लाखो वारकऱ्यांचा समुद्र- जो दर वर्षी वाढतोच आहे, त्याला काळाचे बंधन कधीच राहणार नाही कारण ती परंपरा नाही तो आहे 'आनंद सोहळा' , 'आनंद निधान'!




Comments

Popular posts from this blog

जो वादा किया वो निभाना पड़ेगा

First Contact

Swades: Vibrant canvas of characters on journey of self discovery!