वेडात मराठे..


शिवरायांनी गुलामीत पिचलेल्या महाराष्ट्राला मान ताठ करून उभे राहायला शिकवले. सोळाव्या वर्षी डोळ्यात स्वराज्याची स्वप्ने घेऊन त्यांनी सुरु केलेल्या महायज्ञात कित्येक वीरांच्या रक्ताची आहुती पडली. स्वाभिमान, राजांचा शब्द आणि येणाऱ्या पिढीसाठी उद्दात्त स्वराज्याचे स्वप्न डोळ्यांत घेऊन कित्येकांनी जीव तळहातावर घेऊन त्यात उड्या घेतल्या..
सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा बहादूर सरदारांच्या बलिदानाची कहाणी ही मराठ्यांच्या इतिहासातली  स्वाभिमानी, निष्ठावंत आणि ध्येयवेड्यां वीरांच्या रक्ताने रंगलेली भळभळती जखम आहे.
१६७३ च्या सुरवातीला आदिलशाही सरदार बहलोल खानाने स्वराज्यावर आक्रमणे करून रयतेचा छळ मांडला होता. राजांनी त्याला रोखण्यासाठी सरसेनापती प्रतापरावांना चालून जाण्याचे आदेश दिले.
प्रतापरावांचे मूळ नाव कुडतोजी गुजर असे होते, मिर्झा जयसिंगाच्या स्वारी दरम्यान त्यांनी खूप बहादुरी दाखवली. राजांनी त्यांना सरनौबत म्हणजेच सरसेनापती बनवून 'प्रतापराव' अशी पदवी दिली, हे बहुतेक साल्हेर च्या लढाई नंतर घडले असावे.    
नेसरी जवळ प्रतापरावांनी खानाला वेढले व त्याची रसद तोडून त्याला जर्जर केले. खानाचा पाडाव झाला व तो सैन्यासहित पकडला गेला, दिवस होता 15 एप्रिल 1673 चा. राजांनी प्रतापरावांना खानाला सापडला तर बंदी बनवण्याचे आदेश दिले होते. पण खान गयावया करू लागला 'आम्ही पुन्हा अशी आगळीक करणार नाही, आम्हाला माफ करा'. मोठ्या मनाच्या प्रतापरावांनी त्याला तंबी देऊन सोडून दिले. संधीचा फायदा घेऊन सुटल्यानंतर काही दिवसांतच बहलोल खानाने पुन्हा त्याच्या कुरघोडी सुरु केल्या.
हा सगळा प्रकार समजल्यानंतर राजांना खुप संताप झाला, साहजिक होते, बहलोल खानासारख्या शत्रूला त्याच्या फौजफाट्यासहित पकडणे म्हणजे आदिलशाहीला मोठा शह देण्याची संधी होती. संतापाच्या भरात राजांनी प्रतापरावांना 'जोपर्यंत खान पुन्हा पकडला जाणार नाही तोपर्यंत आम्हाला तुम्हाला भेटण्याची वा पाहण्याची बिलकुल इच्छा नाही' असे खरमरीत पत्र लिहून टाकले!
विचार करा, 'ज्या राजांच्या शब्दावर आयुष्य पणाला लावले, त्याच राजांना आपण दुखावले, आपल्याकडून फार मोठी चूक झाली, आता आयुष्याला काय अर्थ' असेच त्या स्वाभिमानी सरदाराला वाटले असेल ना? राजांनाही त्यांना दुखवायचे नसेल, पण प्रतापरावांसाठी तो धक्का मोठा होता. त्या दिवसापासून त्यांनी निश्चय केला, बहलोल खान जिथे भेटेल, तेथे त्याला पकडायचा. संताप, पश्चाताप आणि बदल्याच्या आगीत प्रतापराव होरपळू लागले!
24 फेब्रुवारी 1674 चा तो दिवस.. प्रतापराव आपल्या 1200 मावळ्यांच्या शिबंदीसह कोल्हापूर जवळ मुक्कामाला होते. इतक्यात कोण्या घोडेस्वाराने दौडत येऊन त्यांना खबर दिली कि बहलोल खान जवळच आहे. खानाला पुन्हा पकडण्याची चांगली संधी होती, फक्त प्रश्न एवढाच होता कि खानाकडे 17 हजाराची शिबंदी होती. त्याच्यावर 1200 स्वारांसह चालून जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच होते. पण सूडाच्या आगीत जळणारे प्रतापराव बेभान होते, त्यांना जीवाची पर्वा कुठे राहिली होती, त्यांना कसेही करून बहलोल खानाला राजांसमोर उभा करायचा होता आणि राजांकडून झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त घ्यायचे होते.
इथून पुढे काय झाले असावे हे कोणी पाहिले नाही, प्रतापरावांनी कोणाला ते काय करणार आहेत ते सांगितलेही नसावे.. पण जेव्हा ते घोड्यावर मांड टाकून खानाच्या दिशेने निघाले, तेव्हा ते काय करणार असावेत ह्याची कल्पना बाकींना आली असावी. कोणाला काही समजण्याच्या आत व पुढचा कुठलाही विचार न करता गर्दीतून सहा वीरांनी पुढे येऊन घोड्यांवर मांड टाकलीही होती आणि ते त्यांच्या सेनापतीबरोबर बहलोल खानाच्या छावणी कडे दौडू लागले होते!
धन्य ते वीर.. आपला राजा सुरक्षित राहावा, आपले स्वराज्य व्हावे, त्या बदल्यात आपला प्राण गेला तरी बेहेत्तर अशी विचार करणारी ती माणसं आणि तशी जीवाला जीव देणारा माणसं तयार करणारा राजा! इतिहासाने अशी बेभान वादळं क्वचितच पहिली असतील!
प्रतापराव व त्यांचे सहा शूर शिपाई बेभान होऊन धूळ उडवत खानाच्या छावणीकडे जेव्हा निघाले असतील तेव्हा तिकडे काय गहजब झाला असेल विचार करवत नाही.. एक तर त्यांना मावळ्यांची जाम दहशत होती, दुसरं म्हणजे खुद्द मराठ्यांचा सरसेनापती दौडत येतो आहे.. ते नक्की घाबरले असतील!
पण जसे ते सात वीर जवळ पोहोचले असतील आणि त्यांच्या दिमतीला कुमक नाही असे लक्षात आल्यावर त्यांचा धीर चेपला असेल.. सात बेफाम वीर त्या 17000 च्या समुद्रात कुठे टिकणार होते.. पण तरीही ते लढले.. थोडा वेळ ते काळोखातल्या काजव्यासारखे चमकले.. मग विझले..
जिथे त्यांचे रक्त सांडले ती जागा कोण्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही..
त्या संध्याकाळी इतिहास खुप रडला असेल.. अशी अवलिया माणसं त्याला सारखी भेटत नाहीत.. पण शिवाजी नावाच्या त्या जादूगाराकडे काय जादू होती काय माहित.. त्याने मातीच्या पुतळ्यांत जीव फुंकावा तसा महाराष्ट्र जिवंत केला.. आणि मग सह्याद्रीच्या कडे-कपार्यान्मधून अशी सोन्यासारखी माणसं घडायला लागली.. स्वाभिमान, स्वामी आणि स्वराज्यासाठी प्राण फुंकून देणारी अशक्य, असामान्य, अद्भुत माणसं!
प्रतापरावांबरोबर बलिदान देणाऱ्या वीरांची नावे पुढील प्रमाणे.
          1  विसाजी बल्लाळ 
          2. दिपोजी राऊत राव
          3. विठ्ठल पिलाजी अत्रे 
          4. कृष्णाजी भास्कर 
          5. सिद्धी हिलाल 
          6. विठोजी शिंदे                   
             
जर हा प्रसंग त्याच्यामधल्या सगळ्या वीरश्रीसह वर्णायचा असेल तर लेखणीही शब्दप्रभू  कुसुमाग्रजांसारखी असायला हवी..
त्यांची कविता 'वेडात मराठे वीर दौडले सात' ही वाचली किंवा लतादीदींच्या आवाजात ऐकली की जणू त्या वीरांचे चेहरे समोर येतात.. महाराष्ट्राच्या इतिहासातले हे हरवलेले पान कुठेतरी फडफडते आणि त्या सात वीरांच्या घोड्यांच्या टापामागे उडत जाणाऱ्या धुळीसारखा इतिहास काही शेकडो वर्षे मागे जाऊन पुन्हा त्या नररत्नांना मन भरून पाहून घेतो..  त्या वीरांना माझे वंदन!
खाली कुसुमाग्रजांची कविता..

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !
-- कुसुमाग्रज   

Comments

Popular posts from this blog

जो वादा किया वो निभाना पड़ेगा

Swades: Vibrant canvas of characters on journey of self discovery!

तुम्हारी ख़ामोशी (Hindi poem)